Saturday, 14 Dec, 10.10 pm पोलीसनामा

होम
निरक्षर असले तरी शिकणाऱ्या पीढिचा अभिमान : बीजमाता राहीबाई

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन - 'शिकलेले पुस्तकं लिहितात, वाचतात, मला मात्र लिहिता - वाचता येत नाही. पण शाळा कॉलेजातून मला बोलायला लावतात, आपुलकीने मान देतात, खूप समाधान आहे. मुलाबाळांची नवी पीढि शिकते, त्यांच्याशी बोलायला आवडतं मला', असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विख्यात 'बीजमाता' ( सीडमदर ) राहीबाई पोपेरे यांनी केले.

अगस्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . सुनील शिंदे आणि प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांच्या ' लोकधाटी ' या लेखसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी अकोले ता . एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे होते . सेंद्रिय शेती, गावरान बियाणे आणि विषमुक्त शेतीचे मोल समजावता राहीबाई पोपेरे पुढे म्हणाल्या की, ' कळायला लागल्यापासून शेतीशी नातं जोडलं गेलं. पारंपरिक वाण कसदार आहे . आजकाल डॉक्टर लोकच विचारतात मला , बाळं कुपोषित का असतात! खरंतर जे कारण डॉक्टरांनी शोधायचं तेच विचारात मला ! आपली जमीन आपली काळी आई आहे.

परसदारी , कुंड्यात , आहे त्या शिल्लक जागेत भाजीपाला लावा . जगवा , वाढवा , गावरान वाण खा . मात्र रसायनांचा वापर करुन , फवारणी करुन विषारी खाऊन कँसर , कुपोषण आणि आजार वाढवू नका . चांगल्या कामाचे चांगले फळ येते. रानभाज्या, गावरान वाण यांचा वापर वाढावा. चकाकतं तेच चांगलं समजून फसवणूक नका करुन घेऊ . जुन्यात ताकद असते . शेतजमीन आणि आपलं आरोग्य जपा.'

अध्यक्ष जे. डी. आंबरे यांनी ' लोकधाटी ' संग्रहाच्या निर्मितीविषयी कौतुक करुन मनोगत व्यक्त करताना म्हटले , ' चालीरीती , लोकरिवाज यांविषयी डॉ. शिंदे आणि डॉ. शेळके यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. ' सीडमदर ' राहीबाई मार्मिक , मोकळं आणि सहज संवादातून बोलतात. तालुक्याचा अभिमान असणारी ही बाब आहे. '

' लोकधाटी ' च्या प्रकाशक ' गाथा कॉग्निशन 'च्या संचालिका डॉ. कल्पना भगत - नेहेरे यांनी पुस्तकातील अकोले, संगमनेर, जुन्नर तालुक्यातील लोकपरंपरा, मनोरंजनाचे लोकसाहित्यावरील स्रोत यांचा परामर्श घेतला. ' लोकधाटी ' चे लेखक उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे आणि प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी पुस्तकामागील प्रेरणा तसेच निर्मितीची पार्श्वभूमी कथन केली.

राहीबाई पोपेरे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ' बाएफ् ' चे अधिकारी जितीन साठे, ज्येष्ठ नेते, जलसंधारणाचे अभ्यासक, अकोले एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त मीनानाथ पांडे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, खजिनदार एस्. पी. देशमुख, आरीफ तांबोळी, पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. आर. डी. पल्हाडे, प्राचार्य संतोष कचरे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, भावगीत गायिका सौ. अरुणा मीनानाथ पांडे, ' विशाल गणेश एंटरप्रायझेस ' अहमदनगर चे नीलेश गिरमे, विनायक लोंढे ( पुणे ), डॉ. विजय भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. संदेश कासार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एच्. पळसकर यांनी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top