Tuesday, 21 Aug, 11.28 am पोलीसनामा

होम
समाजकार्य करताना स्वतःचे आरोग्य जपावे : विलास चाफेकर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

सामाजिक कार्यकर्ता अनेक वंचितांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्यासाठी झटत असतो. चांगल्या कामातून दुसऱ्याला आनंद देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अनेकांना उभारी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला निवृत्तीची मुभा नसते. ते अखेरपर्यंत चालू ठेवता येते," असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांनी केले.

अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था आयोजित 'डॉ. पूजा यादव स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळ्यात विलास चाफेकर बोलत होते. बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात झालेल्या या सोहळ्यात अलका मलप्पा गुजराल यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच लुई ब्रेल अंध अपंग पुनर्वसन केंद्र आणि बारामती येथील घर आंगण संस्थेला अनुक्रमे ३० हजार व २० हजार रूपये देणगी देण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नाट्यअभिनेत्री जयमाला इनामदार, फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नवांदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक विठ्ठल माने, भोई प्रतिष्ठानचे डॉ मिलिंद भोई, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, वंचित विकासच्या संचालिका मीना कुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, तम्मा विटकर, सत्यंद्र कोंढरे, राजेंद्र भवाळकर, नारायण कोटला स्वाती कथलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात नीता (नाव बदलले आहे) यांची संघर्ष गाथा रजनी ठुसे यांनी उलगडली. आज नीता यांची मुलगी महाविद्यालयात शिकत आहे.

किशोर नवांदे म्हणाले, "समाजाने दूर केलेल्या लोकांसाठी समाजसेवा करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे काम असून, यादव कुटुंबाने तरुण पिढीला आदर्श घालून दिला आहे." जयमाला इनामदार यांनी डॉ. पूजा यादव यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यरुपाने पूजा आजही जीवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. अलका गुजराल यांनीही सत्काराला उत्तर दिले. प्रकाश यादव यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले.

Dailyhunt
Top