Wednesday, 21 Apr, 1.25 pm पोलीसनामा

होम
'शेवटचे Good Morning' ! कोरोनामुळे निधन झालेल्या महिला डॉक्टरची Facebook पोस्ट, मुंबईतील घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. ज्याप्रमाणे सामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. त्याचप्रमाणे फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्या जास्त आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. एका 52 वर्षीय महिला डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या डॉक्टरने मृत्युपूर्वी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या मृत्यूचे संकेत दिले होते. या महिला डॉक्टर मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या. सीएमओ डॉक्टर मनीषा जाधव असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

मुंबईतील क्षयरोग रुग्णालयात सीएमओ डॉ. मनिषा जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉ. मनिषा जाधव यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे 18 एप्रिल रोजी त्यांना कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. जाधव यांच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी (दि.19) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी दोन दशकाहून अधिक काळ शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात सेवा दिली होती. डॉ. जाधव यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी, कारण अखेरचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून त्यातून त्यांनी तसे संकेत दिले होते.

डॉ. मनिषा जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी फेसबुकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती आणि मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी मृत्यूची पुसटशी कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारांमध्ये आणि सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top