Laxman Hake News : व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर ओबीसींच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात. मात्र, गेल्या काही वर्षांत ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर…
हिंगोली : राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी राज्यकर्त्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले असून, आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांविरोधात १ सप्टेंबर रोजी मुंबईत मोठे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. या आंदोलनात राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
हिंगोली येथील शासकीय ओबीसी विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले. मागील तीन ते चार वर्षांत सत्ताधारी आणि राजकारण्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहोचविल्याचा आरोप हाके यांनी केला.
'ओबीसींच्या हक्काचा पुन्हा लढा उभारणार' -
प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर ओबीसी समाजाच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून समाजावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. "ओबीसींच्या हक्कांसाठी स्वातंत्र्याच्या लढ्याप्रमाणे पुन्हा एकदा संघर्ष उभा केला जाईल," असा इशारा हाके यांनी दिला.
१ सप्टेंबरला मुंबईत शक्तिप्रदर्शन -
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरातील ओबीसी बांधवांना एकत्र आणून १ सप्टेंबर रोजी मुंबईत आंदोलन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी आणि ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी आंदोलनातून केली जाणार असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.
हिंगोलीत पदाधिकाऱ्यांची बैठक -
मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत ओबीसी आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा समन्वयक अॅड. रवी शिंदे, दिनकर कोकरे, एकनाथ कुटे, विलास आघाव, वैजनाथ पावडे, डॉ. नागोराव जांबूतकर, अशोक श्रीरामे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आता १ सप्टेंबरच्या मुंबई आंदोलनासाठी ओबीसी समाजाची किती मोठी एकजूट उभी राहते आणि सरकार या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Related
Laxman Hake News : व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर ओबीसींच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात. मात्र, गेल्या काही वर्षांत ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर…
'ओबीसींच्या हक्काचा पुन्हा लढा उभारणार' -
१ सप्टेंबरला मुंबईत शक्तिप्रदर्शन -
हिंगोलीत पदाधिकाऱ्यांची बैठक -

