Narhari Zirwal Adivasi Andolan Pune Protest : 'खाऊन-पिऊन आंदोलन करा'; नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला, आंदोलनकर्त्यांनी दिलं प्रत्युत्तर
पुणे : पुण्यातील मांजरी येथे गेल्या 14 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना "खाऊन-पिऊन आंदोलन करा", असा सल्ला दिला. झिरवळ यांच्या या विधानावर विद्यार्थ्यांनीही त्यांना थेट प्रत्युत्तर दिल्याने आंदोलनस्थळी काही काळ वातावरण तापले. झिरवळ यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी मांजरीतील आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरकारकडे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसलेल्या विद्यार्थ्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र, मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन किंवा शासन निर्णय (GR) मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
'आम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करायचो…'
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरहरी झिरवळ यांनी "खाऊन-पिऊन आंदोलन करा," असा सल्ला दिला. त्यावर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी झिरवळ यांना थेट उत्तर देत, "आम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही इथे आले नसते," असे सुनावले.
झिरवळ विद्यार्थ्यांना म्हणाले, जेवण करुन आंदोलन करा ना, महात्मा गांधी तत्वांप्रमाणे आपण आंदोलन करतो. आपण आंदोलन करतो, पण उपोषण करुन काय म्हणून आपण आपल्या जीवाची अवहेलना करतो? मी अनेक आंदोलने स्वत: केली आहेत. मो टोलविरोधात आणि अनेक आंदोलनं केली. पण चोरुन लपवून काहीतरी खायचो, दाखवायचो मात्र आमरण उपोषण" या संवादानंतर झिरवळ यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आंदोलनाच्या गांभीर्याच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी केलेल्या या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशोक उईकेंसोबत पाच तास चर्चा -
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास बैठक घेतली. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत उईके यांनी काही तांत्रिक बाबींवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला. "आदिवासी विभागाचा मंत्री आणि एक पालक म्हणून विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली. आमची पोरं-पोरी आपल्या हक्कासाठी बोलू लागली आहेत, याचा मला अभिमान आहे. काही तांत्रिक बाबींवर विचार करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे," अशी भूमिका उईके यांनी मांडली. मात्र, विद्यार्थ्यांनी सरकारला वेळ देण्यास नकार देत लेखी परिपत्रक मिळाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
14 दिवसांपासून आंदोलन, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली -
मांजरी येथे गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले असून काही विद्यार्थी आमरण उपोषणावर आहेत. दीर्घकाळ उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. वसतिगृहांचा शासन निर्णय, वयोमर्यादा, आदिवासी विभागातील रिक्त पदांची भरती, डीबीटी रकमेत वाढ, संगणक सुविधा, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, जात पडताळणीसाठी मुदत, नवीन वसतिगृहे, बेरोजगारी भत्ता आणि बसपास यांसह विविध मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत.
आता झिरवळ यांच्या 'खाऊन-पिऊन आंदोलन करा' या विधानानंतर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये पुढील चर्चा कशी होते आणि दोन दिवसांत सरकार लेखी निर्णय देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related
पुणे : पुण्यातील मांजरी येथे गेल्या 14 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना "खाऊन-पिऊन आंदोलन करा", असा सल्ला दिला. झिरवळ यांच्या या विधानावर विद्यार्थ्यांनीही त्यांना थेट प्रत्युत्तर दिल्याने आंदोलनस्थळी काही काळ वातावरण तापले. झिरवळ यांच्या या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
'आम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करायचो…'
अशोक उईकेंसोबत पाच तास चर्चा -
14 दिवसांपासून आंदोलन, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली -

