Raghav Chadha News : नीट पेपरफुटीवर मी गप्प का होतो, हा प्रश्न अनेकांनी मला विचारला. पण पूर्वी मी विरोधी पक्षात होतो, तेव्हा प्रश्न विचारणं ही माझी जबाबदारी होती.
नवी दिल्ली (चेतन झडपे) : विरोधी पक्षात असताना सरकारला धारेवर धरणारे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे आणि जेन झी पिढीच्या भावना समजून घेणारे नेते म्हणून ज्यांची ओळख होती, तेच राघव चड्ढा देशात जेन झी एवढं मोठं आंदोलन घडलं असताना कुठे अदृश्य आहेत, असा सवाल उपस्थित होत होता.
नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश पेटला असताना, हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना आणि सोशल मीडियावर सरकारविरोधात संताप व्यक्त होत असताना, राघव चड्ढा मात्र पूर्णपणे शांत का होते? अनेकांनी थेट प्रश्न विचारला, सत्तेत गेल्यावर आवाज हरवला का? अखेर या सर्व प्रश्नांना राघव चड्ढांनी संसदेत उत्तर दिलं आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर मोठा गदारोळ झाला होता. सीजेपीचं संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती, तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. अखेर या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली.
या संपूर्ण काळात अनेक नेते बोलले, अनेकांनी सरकारवर टीका केली, तर काहींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा मात्र या मुद्द्यावर एकदाही बोलले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका झाली. राघव चड्ढा कुठे आहेत? सत्तेत गेल्यावर प्रश्न विचारायचे बंद झाले का? असे सवाल उपस्थित करण्यात आले. आता मात्र संसदेत पेपरफुटीविरोधी विधेयकावर चर्चा सुरू असताना राघव चड्ढांनी पहिल्यांदाच या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं, "नीट पेपरफुटीवर मी गप्प का होतो, हा प्रश्न अनेकांनी मला विचारला. पण पूर्वी मी विरोधी पक्षात होतो, तेव्हा प्रश्न विचारणं ही माझी जबाबदारी होती. आता मी सत्ताधारी पक्षात आहे. त्यामुळे केवळ प्रश्न विचारणं नव्हे, तर त्यावर उपाय शोधणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की, या समस्येवर ठोस उपाय सापडल्यानंतरच मी बोलेन आणि आज तो दिवस आला आहे.
राघव चड्ढा पुढे म्हणाले, "मीही कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देऊ शकलो असतो. पण केवळ वक्तव्य करून काही साध्य होणार नव्हतं. पेपरफुटीसारख्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय हवा. जसं कर्करोगावर क्रोसिन देऊन उपचार होत नाहीत, तसंच पेपरफुटीसारख्या समस्येवर छोट्या-छोट्या प्रतिक्रियांनी उत्तर मिळणार नाही. त्यासाठी संस्थात्मक बदल आवश्यक आहेत आणि हे विधेयक त्याच दिशेने एक पाऊल आहे.
"विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी म्हटलं, "तुमचा राग योग्य आहे. तुमची वेदना खरी आहे आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलच्या तुमच्या तक्रारीही योग्य आहेत. जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली, तेव्हा पंतप्रधानांनी एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्या ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांनंतर सरकारने कारवाई केली आणि ऐतिहासिक निर्णय घेत व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला.
राघव चड्ढांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "नीटची तयारी फक्त विद्यार्थी करत नाही, तर त्याचं संपूर्ण कुटुंब ती परीक्षा देत असतं. आई घरखर्च कमी करते, वडील शिकवणीची फी आणि घरखर्चासाठी बचत खर्च करतात, अनेकांना कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे पेपरफुटी ही केवळ परीक्षा बिघडवणारी घटना नाही, तर लाखो कुटुंबांच्या स्वप्नांवर घाव घालणारी घटना आहे."आता राघव चड्ढांच्या या स्पष्टीकरणानंतर विरोधकांचा आरोप थांबेल की त्यांच्यावर आणखी प्रश्न उपस्थित होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Related
नवी दिल्ली (चेतन झडपे) : विरोधी पक्षात असताना सरकारला धारेवर धरणारे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे आणि जेन झी पिढीच्या भावना समजून घेणारे नेते म्हणून ज्यांची ओळख होती, तेच राघव चड्ढा देशात जेन झी एवढं मोठं आंदोलन घडलं असताना कुठे अदृश्य आहेत, असा सवाल उपस्थित होत होता.

