Rohit Pawar Vs Chandrakant Patil : एमपीएससी आणि विद्यापीठातील पदवी घोटाळ्यावर रोहित पवार आक्रमक; '१० दिवसांत उत्तर द्या, अन्यथा चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी'
पुणे (चेतन झडपे) : एमपीएससी भरती प्रक्रिया, विद्यापीठातील विनापरीक्षा पदवी प्रकरण आणि प्राध्यापक भरतीतील कथित गैरव्यवहार या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विद्यापीठाकडून खोट्या आणि विनापरीक्षा पदव्या दिल्या जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून हे केवळ एका अधिकाऱ्यापुरते मर्यादित नसून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, विद्यापीठाकडून खोट्या पदव्या देणे ही मोठी चूक आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी मुखेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली असली, तरी एवढ्यावरच प्रकरण संपत नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. केवळ एका व्यक्तीवर कारवाई करून जबाबदारी झटकता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर गंभीर आरोप करत, भाजपच्या विचारसरणीशी संबंधित काही व्यक्तींना विद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी स्थान देण्यात आल्याचा दावा केला. भाजपचे पदाधिकारी राजेश पांडे यांचा विद्यापीठ परिसरात नियमित वावर असल्याचे सांगत या सर्व संबंधांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
या प्रकरणाची केवळ विभागीय चौकशी न करता फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. गेल्या दहा वर्षांत विद्यापीठाने दिलेल्या सर्व पदव्यांचे ऑडिट करून त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला आहे का, याची तपासणी व्हावी, असे त्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "या संपूर्ण प्रकारासाठी चंद्रकांत पाटील यांना जबाबदार का धरू नये?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करत, विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी केली.
एमपीएससी आणि विद्यापीठातील भरती प्रक्रियेवरही त्यांनी गंभीर आरोप केले. एका प्राध्यापकाच्या भरतीसाठी तब्बल एक कोटी रुपये घेतले जात असल्याचा आरोप करत, गुणवत्तेऐवजी 'तोंड पाहून' प्राध्यापकांची नियुक्ती केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे ते म्हणाले.
विनापरीक्षा पदवी प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी यावर सार्वजनिक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. पुढील १० ते १२ दिवसांत या संपूर्ण प्रकरणातील तपास कुठपर्यंत पोहोचला, कोणावर कारवाई झाली आणि सरकारने कोणती पावले उचलली, याची माहिती जनतेसमोर ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की, पुढील १० दिवसांत चंद्रकांत पाटील यांनी या सर्व आरोपांवर समाधानकारक उत्तर दिले नाही, तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येईल. तसेच विद्यापीठातील पदवी वितरण, भरती प्रक्रिया आणि संबंधित आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र व निष्पक्ष फॉरेन्सिक ऑडिट करून संपूर्ण सत्य बाहेर आणण्याची मागणी त्यांनी केली.
Related
Rohit Pawar Vs Chandrakant Patil : एमपीएससी आणि विद्यापीठातील पदवी घोटाळ्यावर रोहित पवार आक्रमक; '१० दिवसांत उत्तर द्या, अन्यथा चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी'

