Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sanjay Kakade On Congress : संजय काकडेंचा काँग्रेसला अल्टिमेटम; जाहीर माफी मागा नाहीतर.

Sanjay Kakade On Congress : संजय काकडेंचा काँग्रेसला अल्टिमेटम; जाहीर माफी मागा नाहीतर.

Sanjay Kakde On Congress : "राहुल गांधी आणि शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही, तर आम्ही त्याला त्यांचा पाठिंबा समजू. आम्ही त्यांना ४८ तासांचा अवधी देत आहोत.

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी खासदार संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत काँग्रेस खासदार राहुल गांधी, खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संबंधित वक्तव्याचा निषेध करत काकडे यांनी काँग्रेसने तातडीने सुनेत्रा पवार आणि राज्यातील महिलांची जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

संजय काकडे म्हणाले की, "काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे हे केवळ वैयक्तिक मत नसून पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे दिसते. "पृथ्वीराज चव्हाण हे ज्ञानी आणि परिपक्व नेते आहेत, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विकृत मानसिकतेचे वक्तव्य करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.

याप्रकरणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून या वक्तव्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केल्याचेही काकडे यांनी सांगितले. "राहुल गांधी यांच्या लक्षात कसे येत नाही की त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महिलांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुनेत्रा पवार यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मोठा वैयक्तिक आघात झाला होता. त्या अजूनही त्या दुःखातून पूर्णपणे सावरलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे काकडे म्हणाले. "महिलांच्या सन्मानाच्या आणि सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी याबाबत मौन का बाळगले आहे? शरद पवार यांचा महिलांबद्दलचा आदर आणि स्वतःच्या सुनेबद्दलचा सन्मान कुठे गेला?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची आणि राज्यातील महिलांची सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करत काकडे म्हणाले की, "दिल्लीत जसे आंदोलन झाले तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होईल. इंदिरा गांधी यांच्याबाबत जेव्हा राजकीय भाष्य झाले तेव्हा त्या परिपक्व नेत्या होत्या. मात्र सुनेत्रा पवार अजूनही वैयक्तिक दुःखातून बाहेर पडत आहेत. अशा महिलेबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही."

यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांचे कौतुक करत, "सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील इंदिरा गांधी ठरतील," असा दावा केला. तसेच काँग्रेसवर निशाणा साधत, "महिलांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसला अशा वक्तव्याची लाज वाटत नाही का?" असा सवाल केला.

संजय काकडे यांनी काँग्रेस नेत्यांना थेट इशाराही दिला. "राहुल गांधी आणि शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही, तर आम्ही त्याला त्यांचा पाठिंबा समजू. आम्ही त्यांना ४८ तासांचा अवधी देत आहोत. त्यानंतर राज्यभर गल्लीबोळात आंदोलन उभे राहील. काँग्रेसच्या नेत्यांना फिरू देणार नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळ यांनाही फिरू देणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.


Related

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी खासदार संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत काँग्रेस खासदार राहुल गांधी, खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संबंधित वक्तव्याचा निषेध करत काकडे यांनी काँग्रेसने तातडीने सुनेत्रा पवार आणि राज्यातील महिलांची जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra