Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ShivSena News : महापुरुषांच्या प्रतिमांसमोर भोजपुरी अश्लील गाण्यावंर महिलांचा नाच; शिंदेंच्या कार्यक्रमावर ठाकरेंचा प्रहार!

ShivSena News : महापुरुषांच्या प्रतिमांसमोर भोजपुरी अश्लील गाण्यावंर महिलांचा नाच; शिंदेंच्या कार्यक्रमावर ठाकरेंचा प्रहार!

Akhil Chitre criticized Prakash Surve : "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय."

मुंबई : मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना संवादापुरती कामचलाऊ मराठी भाषा शिकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आता राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानावर रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत अमराठी रिक्षा चालकांना प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे देण्यात आली. मात्र, कार्यक्रमादरम्यान झालेल्या भोजपुरी नृत्याच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे.

या प्रकारावरून ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. चित्रे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत कार्यक्रमाच्या आयोजनावर टीका केली. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमा असताना त्यांच्यासमोर भोजपुरी अश्लील गाण्यांवर महिला नाचवल्या गेल्याचा आरोप चित्रे यांनी केला आहे.

'असा कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतो का?'

अखिल चित्रे यांनी या कार्यक्रमावर सवाल उपस्थित करत आयोजक आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर टीका केली. व्यासपीठावर महापुरुषांच्या प्रतिमा असताना अशा प्रकारचा भोजपुरी अश्लील गण्यांवर महिलांचा नाच कार्यक्रम आयोजित करणे योग्य आहे का? असा प्रश्न ठाकरे सेनेचे चित्रे यांनी उपस्थित केला. चित्रे यांनी आपल्या पोस्टमधून शिवसेना शिंदे गटाच्या भूमिकेवरही निशाणा साधला. महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता याबाबत शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर भाष्य केले जाते; मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये वेगळे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरही सवाल -

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यामुळे अखिल चित्रे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत?" असा सवाल करत चित्रे यांनी शिंदे सेनेला लक्ष्य केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे सेनेने पुन्हा एकदा शिंदे सेनेच्या महाराष्ट्राच्या अस्मिता आणि संस्कृतीवरील भूमिकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम वादात -

मुंबईत मोठ्या संख्येने रिक्षा आणि टॅक्सी चालक कार्यरत आहेत. प्रवाशांशी संवाद साधताना त्यांना मूलभूत मराठी भाषा अवगत असावी, या उद्देशाने व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षणाचा उपक्रम राबवण्यात आला. त्याच कार्यक्रमात प्रमाणपत्र वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मराठी भाषा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात भोजपुरी नृत्याचा कार्यक्रम झाल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे.


Related

Akhil Chitre criticized Prakash Surve : "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय."

'असा कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतो का?'

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरही सवाल -

मराठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम वादात -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra