बंदी काळात कूपन, डिझेल, पाससह कोणत्याही प्रकारचे शासकीय सहकार्य मिळणार नाही
१२ नॉटिकल मैलांच्या राज्य हद्दीत मासेमारीवर कडक बंदी; मत्स्य विभागाची यंत्रणा सतर्क
मत्स्य उत्पादन वाढ व मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी बंदीचे काटेकोर पालन करण्याच आवाहन
मुंबई : राज्य सरकारने १५ ऑगस्टपर्यंत समुद्रातील मासेमारीवर बंदी लागू केली असून या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांना कोणत्याही प्रकारचे शासकीय सहकार्य दिले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात राणे म्हणाले की, राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मासेमारीला परवानगी नाही. या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी पूर्णपणे सज्ज असून समुद्रातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
बंदीच्या कालावधीत मासेमारी करणाऱ्यांना मत्स्य विभागाकडून कूपन, डिझेल, पास अथवा इतर कोणत्याही प्रकारची शासकीय मदत किंवा सुविधा दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व मच्छीमारांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ही बंदी मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना आणि भविष्यात मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, याचा थेट फायदा मच्छीमारांच्या उत्पन्नवाढीस आणि आर्थिक उन्नतीस होणार असल्याचे राणे यांनी नमूद केले.
सर्व मच्छीमार बांधवांनी १५ ऑगस्टपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न उतरता मत्स्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करत त्यांनी बंदीचे प्रामाणिकपणे पालन करण्याची विनंती केली.

