सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्यवसायाचा ७००० कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार करत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या भव्य कामगिरीबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
प्रभाकर सावंत यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अल्पावधीत सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कामगिरी करत ७००० कोटींचा टप्पा पार करणे ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. या यशामागे बँकेच्या अध्यक्षांचे सक्षम नेतृत्व, संचालक मंडळाचे योग्य मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य सभासदांना भक्कम आर्थिक आधार देण्याचे कार्य जिल्हा बँक सातत्याने करत आहे. ठेवी वाढ, कर्जवाटपातील गती, वसुलीची सुधारलेली स्थिती आणि डिजिटल सेवांचा वाढता वापर यामुळे बँकेची विश्वासार्हता अधिक मजबूत झाली आहे.
भविष्यातही अशाच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत जिल्ह्याच्या आर्थिक विकासात जिल्हा बँकेचे योगदान अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करत सावंत यांनी संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

