Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
९० शेतकऱ्यांना मिळणार मोफत बायोगॅस

९० शेतकऱ्यांना मिळणार मोफत बायोगॅस

सावंतवाडी : ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरामुळे होणारा त्रास कमी करून स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माणगाव, कुडाळ येथे ९० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोफत बायोगॅस प्रकल्पासंदर्भात सामूहिक चर्चा व मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत बायोगॅस युनिटचे उद्दिष्ट, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, युनिटचा वापर कसा करावा, त्याचे फायदे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बायोगॅसच्या वापरामुळे घरगुती एलपीजी गॅसवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून, जनावरांच्या शेणाचा योग्य वापर होऊन गोवंश संवर्धनालाही प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच लाकूड जाळण्याचे प्रमाण कमी झाल्याने जंगलसंपत्तीचे संरक्षण, धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करणे आणि महिलांच्या आरोग्याचे रक्षण करणे शक्य होणार आहे.

या वेळी बायोगॅसच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत अध्यक्ष दयानंद कुबल यांनी व्यक्त केले. बायोगॅस प्रकल्पाशी जोडून गांडूळखत निर्मितीचे प्रकल्प सुरू करता येतील का, यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खत उपलब्ध होण्याबरोबरच पूरक उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते.

गावातील महिलांना स्वयंपाकासाठी लाकडे जाळावी लागतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. महिलांना या त्रासातून मुक्तता मिळावी, इंधनावरील खर्च कमी व्हावा आणि पर्यावरणपूरक ऊर्जा पर्याय गावागावांत उपलब्ध व्हावा, हे कोकण संस्था आणि आरसिल कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीला अध्यक्ष दयानंद कुबल, प्रीती पंगे, साक्षी पोटे, कामाक्षी महालकर, प्रथमेश सावंत, गौरी आडेलकर, रुचा पेडणेकर, वैशाली म्हाडगुत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले, तर गौरी आडेलकर यांनी प्रास्ताविक केले.

९० शेतकऱ्यांना मोफत घरगुती बायोगॅस उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून स्वच्छ ऊर्जा, महिलांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ अशा विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital