सावंतवाडी । प्रतिनिधी : रुपेश राऊळ यांनी विनाकारण आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करणे थांबवावे. अन्यथा त्यांची संपूर्ण कुंडली आमच्याकडे असून ती जनतेसमोर आणू,' असा थेट इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला आहे.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, रुपेश राऊळ यांनी गेल्या काही दिवसांपासून आमदार दीपक केसरकर यांचे नाव घेऊन जाणीवपूर्वक आरोप करण्याचे सत्र सुरू केले आहे. मात्र, आजपर्यंत राऊळ हे स्वतः केसरकर यांच्याच जीवावर राजकारण करत होते आणि आपले पोट भरत होते. केवळ राजकीय हेतूने उगाचच कोणावरतरी आरोप करायचे आणि त्यातून काहीतरी पदरात पाडून घ्यायचे, हाच त्यांचा एकमेव धंदा आहे, अशी टीका परब यांनी केली.
गेली पंचवीस वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या रुपेश राऊळ यांनी आधी स्वतःचा अधिकृत व्यवसाय काय आहे, हे जनतेसमोर मांडावे आणि त्यानंतरच दीपक केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर बोलावे. सावंतवाडीतील जनतेला सर्व काही ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका. जर विनाकारण सुरू असलेले हे आरोप थांबवले नाहीत, तर राऊळ यांची सर्व काळी कृत्ये आणि कुंडली जनतेसमोर आणली जाईल, असे परब यांनी ठणकावून सांगितले.
आडाळी एमआयडीसी माती चोरी प्रकरणात कारवाई होणार
यावेळी बोलताना संजू परब यांनी आडाळी एमआयडीसीचा मुद्दाही उपस्थित केला. आडाळी एमआयडीसीमध्ये झालेल्या माती चोरी प्रकरणात संबंधितांवर लवकरच उद्योगमंत्र्यांकडून कडक कारवाई झालेली पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेला सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव, दोडामार्गचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांच्यासह इतर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

