Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आदिशक्ती अभियान स्पर्धेत गोठणे दोनिवडे ग्रामपंचायत जिल्हास्तराव प्रथम

आदिशक्ती अभियान स्पर्धेत गोठणे दोनिवडे ग्रामपंचायत जिल्हास्तराव प्रथम

राजापूर (वार्ताहर): शासनाच्या वतीने ग्रामस्तरावर राबविण्यात आलेल्या आदिशक्ती स्पर्धेत तालुक्यातील गोठणे दोनिवडे ग्रामपंचायतीच्या आदिशक्ती महिला सक्षमीकरण समितीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

शासनाने नुकत्याच महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आदिशक्ती अभियान राबविले होते. या अभियानात ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेणे, सामाजिक दृष्ट्या महिलांना सक्षम करणे तसेच महिला नेतृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे अशी अनेक उद्दिष्टे ठरवण्यात आली होती.
दिनांक २२ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम राबविणे महत्वाचे होते. या अभियाना अंतर्गत एकूण १३ निकष निश्चित करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने राज्य, जिल्हा आणि ग्राम पातळीवर ही आदिशक्ती अभियान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गोठणे दोनिवडे ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. आता जिल्हास्तरावरील स्पर्धेतही बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रस्थापित नसलेल्या आणि कष्टकरी जनता मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या अभियानात सहभागी होणे आणि शेवटपर्यंत टिकून राहणे अतिशय कठीण काम होते, परंतु गोठणे दोनिवडे ग्रामपंचायतीच्या आदिशक्ती अभियान अध्यक्षा श्रेया शिंदे, सरपंच मुकेश विचारे यांनी सातत्याने सर्व सहकाऱ्यांसोबत विविध उपक्रम यशस्वी केले आणि जिल्हास्तरावर प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
या अभियान यशस्वी होण्यासाठी समिती सदस्य श्रीधर हातणकर, श्रध्दा हातणकर, पोलिस पाटील श्रेया हातणकर, ग्रामपंचायत अधिकारी दिपाली वडर, पोलिस पाटील अनुजा झोरे, सायली भोसले यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, बचत गट, आशा, अंगणवाडी सेविका तसेच शासनाचे विविध विभागाचे प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याद्दल गोठणे दोनिवडे ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital