अतिवृष्टीमुळे वनविभागाचा तात्पुरता निर्णय
पावसाचा जोर कमी झाल्यास सुरू करणार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
वर्षा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला आंबोली येथील मुख्य धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनविभागाने घेतला आहे.
सध्या या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी या निर्णयाला अधिकृत दुजोरा दिला आहे.
अतिवृष्टीमुळे सध्या आंबोली धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत वरून पाण्यासोबत लहान-मोठे दगड वाहून येण्याची दाट शक्यता असते. हे दगड पर्यटकांच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या जिवाचा धोका टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव वनविभागाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आणि परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाल्यानंतरच धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिली आहे.
हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास पुन्हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

