Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंबोली घाटात एस.टी. बस आणि मोटरसायकलचा अपघात

आंबोली घाटात एस.टी. बस आणि मोटरसायकलचा अपघात

कोल्हापूरचा युवक गंभीर जखमी

​आंबोली:

आंबोली घाटातील नानापाणी वळणापासून दीड किलोमीटर अंतरावर एका धोकादायक वळणावर एस.टी. बस आणि मोटरसायकल दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात आज (शनिवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर घाटात दोन्ही बाजूंनी सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

​तानाजी सुरेश नंदीकुरळे (वय ४४, रा. मोजगर, शिरोळ, जि. कोल्हापूर) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी नंदीकुरळे हे आपल्या मोटरसायकलने सावंतवाडीच्या दिशेने जात होते. याच वेळी सावंतवाडी आगाराची सावंतवाडी ते अक्कलकोट ही बस अक्कलकोटच्या दिशेने जात होती. घाटातील नानापाणी वळणाच्या खाली असलेल्या एका अवघड वळणावर बस आली असता, सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो थेट एस.टी. बसच्या ड्रायव्हर केबिनच्या बाजूने जोरात आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, तानाजी यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

​अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार रामदास जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने अपघातग्रस्त एस.टी. बस बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी तानाजी नंदीकुरळे यांना एका खाजगी वाहनाने तात्काळ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

​आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद गहाणे यांनी जखमीवर प्रथमोपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार रामदास जाधव करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital