Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंबोली महादेवगड पॉईंटवरील पर्यटकाचा मृतदेह दरीतून वर काढला

आंबोली महादेवगड पॉईंटवरील पर्यटकाचा मृतदेह दरीतून वर काढला

४०० फूट खोल दरीतून मृतदेह काढण्यात 'सह्याद्री ॲडव्हेंचर'ला यश

सावंतवाडी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळून मृत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक प्रयत्न करून त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी निपाणी येथून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वजण महादेवगड पॉईंट परिसरात असताना डॉ. सय्यद हे लघुशंकेसाठी सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. या दरम्यान अचानक त्यांचा तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आंबोली पोलीस संतोष गलोले व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आंबोलीतील 'सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम'ला मदतीसाठी पाचारण केले. रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असणारा संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली. अपघात घडला त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाईल वरच राहिल्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणेही अशक्य झाले होते.

मंगळवारी सायंकाळी थांबवण्यात आलेली ही रेस्क्यू मोहीम बुधवारी पहाटे पुन्हा सुरू करण्यात आली. पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात शोध सुरू असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास मृतदेह खोल दरीत आढळून आला. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

या कठीण ऑपरेशन रेस्क्यूमध्ये सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगलीच्या बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पासकु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते, नारायण चव्हाण, शुभम कळसुलकर, सर्वेश नाईक, मनीष नार्वेकर, वामन पालेकर, राकेश अमरुस्कर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, रघुनाथ सावंत, अभिजित नार्वेकर आणि हेमंत नार्वेकर यांनी सहभाग घेतला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital