मृतदेह सापडला : सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्याची प्रक्रिया सुरू
आंबोली । प्रतिनिधी : आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती.
डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव होते.
डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. या दरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीतील 'सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम'ला मदतीसाठी पाचारण केले. रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, परिसरात सुरू असणारा संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती.
रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला असण्याची शक्यता आहे. अपघात घडला त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाईल वरच राहिला असल्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले होते. या प्रतिकूल परिस्थितीमुळे मंगळवारी सायंकाळी थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी लवकर पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर दहाच्या सुमारास सदरचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. सद्य स्थितीत हा मृतदेह दरीतून वर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

