कायमस्वरूपी वायरमन नियुक्तीची सरपंच सावित्री पालेकर यांची मागणी
आंबोली: आंबोली या प्रसिद्ध पर्यटन स्थळी सध्या पावसाळी पर्यटनासाठी (वर्षा पर्यटन) महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, नागरिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येकडे महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मार्ग काढावा, अशी मागणी केली जात आहे.
तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीस विलंब
भाजपच्या आंबोली सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, आंबोलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरणची ३३ केव्हीची लाईन आंबोली सबस्टेशनला येते आणि तिथून पुढे ११ केव्हीच्या लाईनद्वारे आंबोली, गेळे व चौकुळ या तिन्ही गावांना वीजपुरवठा केला जातो. सध्या या तिन्ही गावांत कंत्राटी पद्धतीवर काम करणारे चार कर्मचारी कार्यरत आहेत. ते वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात.
मात्र, एखादा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास किंवा वीज वाहिनी तुटल्यास दुरुस्तीचे काम करण्यासाठी आंबोली सबस्टेशनमधून आवश्यक असणारे 'परमिट' कंत्राटी कर्मचाऱ्यांना देता येत नाही. ही तांत्रिक परवानगी देणारा कायमस्वरूपी (पर्मनंट) वायरमन उपलब्ध नसल्यामुळे, जे काम एका तासात होऊ शकते त्यासाठी संपूर्ण दिवस किंवा त्याहून अधिक काळ वाट पाहावी लागत आहे.
व्यवसायिकांचे नुकसान आणि आंदोलनाचा इशारा
सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे पर्यटकांकडून हॉटेलचे आरक्षण रद्द केले जात आहे. तसेच हॉटेलमधील अन्नपदार्थ खराब होत असल्याने व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आंबोली, गेळे आणि चौकुळ परिसरात तातडीने कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सौ. पालेकर यांनी केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल, तसेच आगामी आमसभेत या मुद्द्यावर जाब विचारून नुकसानीच्या भरपाईची मागणी महावितरणकडे करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

