राजापूर (प्रतिनिधी): अणुस्कुरा घाटात कोल्हापूरकडे जाताना बुधवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहेयात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
निलेश विलास पाटील असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, अपघातग्रस्त तिघेही बांबवडे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या अपघातानंतर तब्बल एक ते दीड तास उलटून गेले, तरीही घटनास्थळी शासकीय रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला, मात्र गाडीत डिझेल नाही आणि डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी धक्कादायक कारणे प्रशासनाकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
हा अपघात घडल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रुग्णवाहिका न आल्याने स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना तातडीने इतर वाहनांद्वारे मदत पोहचवण्यासाठी धावपळ केली.

