ओटवणे (प्रतिनिधी ) अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या आणि अनेक ज्ञानरत्ने घडवीणाऱ्या श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रति कृतज्ञतेच आपल्या कृतीतून दर्शन घडवीताना आदर्श अस काम केल.आपल्या मातृसंस्थेबद्दलची आत्मीयता आणि ऋणानुबंध जपत शाळेच्या सन २०१२, २०१३ व २०१४ च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या भौतिक गरजांसाठी,विकासासाठी ४६५०० रुपयाची देणगी शाळेकडे सुपूर्द केली.
यावेळी सन २०१२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी कु. विनायक नाईक तसेच सन २०१३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी सौ. साधना गवस. यांनी यासाठी मेहनत घेत आप आपल्या बॅचचे प्रतिनिधित्व करत ही रक्कम जमा केली व कार्यक्रमालाही शाळेत उपस्थिती दर्शविली. त्यातच शाळेसाठी गौरवास्पद गोष्ट म्हणजे या शाळेच्या सौ. साधना गवस (शेटवे ) या गावच्या सरपंच असल्याने शाळेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती जानवी सावंत यांनी या माजी विद्यार्थ्यांच्या योगदाबद्दल, विद्यार्थ्यांनी शाळेविषयी जपलेली कृतज्ञता, आपुलकी आणि विकासासाठी दिलेल्या योगदाना बद्दल आभार व्यक्त केले. ही देणगी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत पारदर्शकपणे व विधायक कामांसाठी वापरण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या मोलाच्या योगदानामुळे इतर माजी विद्यार्थ्यांनाही आपल्या मातृसंस्थेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानवी सावंत यांनी तर आभार शालेय मुख्यमंत्री वेदांगी कोळपाटे यांनी मानलेत.

