Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
असावी नदीपात्रात बेकायदेशीर भराव; धामणी गावाला महापुराचा धोका; ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

असावी नदीपात्रात बेकायदेशीर भराव; धामणी गावाला महापुराचा धोका; ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

देवरूख (प्रतिनिधी):

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या कामाच्या कंत्राटदाराने मौजे धामणी (ता. संगमेश्वर) येथील असावी नदीच्या पात्रात दगडमातीचा प्रचंड भराव केला आहे.

आधीच पूरग्रस्त प्रवण आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेल्या धामणी गावाला यामुळे या पावसाळ्यात मोठ्या महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

​या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत धामणी यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पर्यावरण समिती, रत्नागिरी यांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाचे आदेश नदीतील गाळ रस्त्याच्या कामासाठी वापरण्याचे असताना, कंत्राटदार मात्र नदीतच कामाचा कचरा आणि भराव टाकत आहे. तहसीलदार संगमेश्वर (देवरुख) आणि उपविभागीय अभियंता (राष्ट्रीय महामार्ग, साखरपा) यांनी वारंवार पत्र देऊनही संबंधित कंत्राटदाराने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, जल प्रदूषण अधिनियम १९७४, आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २७७ व ३०४ अन्वये कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. हा भराव रेल्वे पुलाजवळ असल्याने कोकण रेल्वेच्या पुलालाही धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत कोकण रेल्वेलाही अवगत करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी हा भराव तातडीने काढून न घेतल्यास आणि भविष्यात यामुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तीव्र भावना धामणी ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासक, ग्रामपंचायत धामणी यांनी या पत्राद्वारे प्रशासनाला तातडीने भेट देऊन हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital