आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांची तत्परता ; तात्काळ उपाययोजना
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात गुरुवारी सकाळी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत बनले. शहरातील वायरी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रिंगीच्या झाडांची फळे पावसामुळे रस्त्यावर पडून वाहनांच्या वर्दळीमुळे त्यांचा चिखल आणि फेस तयार झाला होता.
यामुळे संपूर्ण रस्ता अत्यंत निसरडा होऊन दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात घडत होते.
रस्त्यावर वाहने घसरत असल्याने धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास येताच मालवण पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाशी संपर्क साधला. तसेच सभापतींनी स्वतःची वाहने मदतकार्यासाठी उपलब्ध करून दिली.
आरोग्य सभापतींच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. स्वच्छता निरीक्षक श्री. पवार, मुकादम श्री. वळंजू, आरोग्य कर्मचारी वैभव वळंजू
यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रस्ता साफ करून वाहतुकीसाठी सुरक्षित केला. सभापती पुनम चव्हाण यांसोबत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अपघातांचा मोठा अनर्थ टळला. सभापती व आरोग्य विभागाने दाखवलेल्या या कार्यतत्परतेबद्दल तसेच आरोग्य सभापतींच्या संवेदनशील भूमिकेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

