युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन
बांदा : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांदा पंचक्रोशीतील गावांमध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवासेना (शिंदे गट) सावंतवाडी तालुकाप्रमुख रियाज खान यांनी केली आहे.
या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन त्यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राशी परिसरातील अनेक गावे आणि खेडी जोडलेली आहेत. पावसाळा सुरू होताच दूषित पाणी आणि बदलत्या वातावरणामुळे आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य केंद्राने पूर्वतयारी करणे गरजेचे आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनात प्रामुख्याने आरोग्य केंद्रात अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात नाहीत, त्या तात्काळ सुरू कराव्यात, पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे सर्पदंश आणि रेबीजवरील लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावी, गरोदर मातांसाठी आवश्यक असणाऱ्या गोळ्या, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा वेळेत पुरवण्यात याव्यात, गावातील सर्व सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा अहवाल तातडीने घेण्यात यावा. पाण्यात काही दोष किंवा प्रदूषण आढळल्यास त्यावर तात्काळ शुद्धीकरणाचे उपाय करावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण याच आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही हलगर्जी न करता या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी रियाज खान यांनी केली आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी पांडुरंग नाटेकर, विभाग प्रमुख राजेश विरनोडकर, भैय्या गोवेकर, सैफान खान, युवासेना उपतालुका प्रमुख मोईन खान, सर्पमित्र राजा खान आदी उपस्थित होते.

