Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांधावरची शाळा उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा अनोखा अनुभव

बांधावरची शाळा उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा अनोखा अनुभव

वेंगुर्ला, : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'बांधावरची शाळा' हा उपक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी शाळेजवळील कोंडुरावाडी येथील शेतकरी श्री. भगवान पेडणेकर यांच्या शेतावर गेले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून लावणीचा अनुभव घेतला तसेच विविध शेती अवजारांची ओळख करून घेत शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. ग्रामीण जीवन, शेतीची मेहनत आणि अन्ननिर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

यानंतर विद्यार्थ्यांनी श्री. अरुण आरोलकर यांच्या शेतालाही भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना भुईमुगाचा बीपासून ते उत्पादना पर्यंतचा संपूर्ण प्रवास समजावून सांगितला. भुईमुगाच्या पिकाची राखण करण्यासाठी तयार केलेल्या मचाणामध्ये विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिकच नव्हे तर आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

या उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. संतोष गोसावी साहेब, सुरंगपाणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुनील गोंधळी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शामल मांजरेकर, शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमात बळीराजाप्रति कृतज्ञता व्यक्त करत मा. गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी साहेब यांच्या हस्ते श्री. भगवान पेडणेकर या शेतकरी दादाला शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना 'शेती ही केवळ व्यवसाय नसून जीवनाचा पाया आहे' हा संदेश दिला. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, निसर्गाशी मैत्री, शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव आणि श्रमसंस्कार या मूल्यांची रुजवण या उपक्रमा - तून प्रभावीपणे झाली.

केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत 'शिकूया बांधावर, जाणूया बळीराजा' हा संदेश कृतीतून साकारला

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital