बांदा पोलिसांची कारवाई
बांदा : प्रतिनिधी
गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बांदा चेकनाका येथे वाहनांची तपासणी सुरू असताना गोव्यातून येणारी कार (एमएच ०७ एएस ६४४१) तपासण्यात आली. वाहनातील गोण्याची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, V-1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला तसेच तुलसी रॉयल जाफरानी जर्दा असा गुटखा व तंबाखूजन्य माल आढळून आला.
कारवाईत सुमारे ३ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच ५ लाख रुपयांची मारुती सुझुकी इको गाडी असा एकूण ८ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे , उपनिरीक्षक गवस ,पीएसआय पवार, काँस्टेबल मुणगेकर, प्रसादी, भोगले, कापसे, पाटील, हिर्लेकर, हळदे यांच्या पथकाने केली आहे.

