देवगड : उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि देवगड पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुक्तसंवाद' या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींशी संवाद साधण्याच्या कार्यक्रममालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण वर्षभर दर महिन्याला अशा एकूण बारा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रममालिकेतील तिसरे पुष्प म्हणून साहित्यिक गोविंद गोडबोले यांचे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. गोविंद गोडबोले हे मूळचे मिरज येथील असून त्यांनी नागपूर, पुणे, रत्नागिरी आदी आकाशवाणी केंद्रांवर अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते सेवानिवृत्त असून विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. विशेषतः बालसाहित्य निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बर्वे लायब्ररी नजीक असलेल्या स्नेहसंवर्धक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर आणि देवगड पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर यांनी केले आहे.

