'कॉकरोच जनता पार्टी' पेजविरोधात पोलिसांत तक्रार
भाजप युवा मोर्चा आक्रमक ; कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी
कणकवली : सोशल मीडियाचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बदनामी केल्याप्रकरणी, भाजप युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी कणकवली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
'कॉकरोच जनता पार्टी' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा खोडसाळपणा केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या इन्स्टाग्राम पेजवरून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो वापरून ते 'कॉकरोच जनता पार्टी'चे पदाधिकारी असल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट सातत्याने व्हायरल केल्या जात आहेत. यामुळे समाजात भाजप कार्यकर्त्याची जाणीवपूर्वक बदनामी होत असून, त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांना हा तक्रार अर्ज देण्यात आला. या अर्जावर संदीप मेस्त्री, हृतिक नलावडे, गणेश तळगावकर, भालचंद्र वरवडेकर, प्रतीक नाईक, अमोल केरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
…तर आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल
सदर प्रकारामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून समाजात गैरसमज पसरत आहेत. भविष्यात असे सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त तातडीने न झाल्यास आम्हाला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

