दोडामार्ग प्रतिनिधी भेडशी खालचा बाजार येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी श्री हनुमान मंदिरात मूर्ती पूजा, अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे हुबेहूब श्री हनुमानाची रंगभूषा आणि वेशभूषा साकारलेले कलाकार होते.
'बजरंग बली की जय' आणि 'हनुमान की जय' अशा जयघोषाने आणि आरतीच्या सुरांनी भेडशी बाजारपेठ दुमदुमून गेली होती. या मिरवणुकीत गावातील अबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्ती आणि उत्साहाच्या या सोहळ्याने भेडशीवासीय मंत्रमुग्ध झाले होते.

