Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास गती

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास गती

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वंकष आरोग्य विकास आराखडा तयार करणार: ना. प्रकाश आबिटकर

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर:आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत आढावा बैठक पार पडली.

यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत दत्तवाड येथील सध्या कार्यरत ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच, शिरोळ ग्रामीण रुग्णालय हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्याने, स्वतंत्र व सुसज्ज रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सर्वंकष आरोग्य विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच, राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी उपकेंद्रांच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्यातील सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांच्या मागणीप्रमाणे उपकेंद्रांना आवश्यक निधी वितरित करण्याची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर), आरोग्य सेवा आयुक्त श्री. संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त श्री. जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) श्री. रवींद्र सावंत,उपसंचालक श्री. जयंत मुळे आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital