Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देवगडमध्ये यंदा रंगणार दशावतार नाट्य महोत्सव!

देवगडमध्ये यंदा रंगणार दशावतार नाट्य महोत्सव!

पारंपरिक दशावतार मंडळांना ५० टक्के सहभाग व वाटा देण्याची मागणी मान्य

कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण

मुंबई : कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या पारंपरिक दशावतार कलेसाठी यंदा आनंदाची बातमी समोर आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारा यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या महोत्सवात पारंपरिक दशावतार मंडळांना ५० टक्के सहभाग व वाटा देण्याची मागणीही सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मान्य केली आहे.

मूळ नऊ पारंपरिक दशावतार मंडळ शिखर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी दशावतार कलेचे जतन, संवर्धन आणि भविष्यातील वाटचाल यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत प्रामुख्याने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणाऱ्या दशावतार नाट्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटनभूमी म्हणून ओळख असलेल्या देवगड येथे यंदाचा महोत्सव आयोजित करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्याचबरोबर महोत्सवाच्या आयोजनात पारंपरिक दशावतार मंडळांना ५० टक्के सहभाग व वाटा मिळावा, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.

या दोन्ही मागण्यांना संचालक प्रशांत खेडेकर आणि उपसंचालक संदीप बलखंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता दिली. त्यामुळे यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव देवगड येथे होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून पारंपरिक दशावतार मंडळांच्या पदाधिकारी व कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, बैठकीत दशावतार मंडळांचे मालक, कलाकार यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, आर्थिक अडचणी, कलाकारांचे हक्क आणि कलेच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. दशावतार ही केवळ मनोरंजनाची कला नसून कोकणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या कलेचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी शासनाने अधिक व्यापक सहकार्य करावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या सदिच्छा भेटीप्रसंगी मूळ नऊ पारंपरिक दशावतार मंडळ शिखर संघाचे अध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव सौरभ पाटकर आणि कार्यकारिणी सदस्य बाबा मेस्त्री उपस्थित होते. पारंपरिक दशावतार मंडळांना महोत्सवात ५० टक्के सहभागाची संधी मिळण्याचा निर्णय हा या लोककलेच्या कलाकारांसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. देवगड येथे होणाऱ्या महोत्सवाच्या माध्यमातून दशावतार कलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा पोहोचण्यास मदत होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital