पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या निर्देशानंतर तातडीची बैठक; पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी मांडला गंभीर प्रश्न
एबी स्विच बसविणार, झाडी हटविणार, इन्सुलेटर बदलणार; दहिबाव-मीठबावसाठी स्वतंत्र उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधीची मागणी होणार
ओरोस, दि. २ : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर पुढील १५ दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या निर्देशानंतर झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. अन्नपूर्णा नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या वीजवाहिनीवर आवश्यक ठिकाणी एबी स्विच बसविणे, जंगलातून जाणाऱ्या वीजवाहिनीवरील झाडी तातडीने हटविणे, खराब इन्सुलेटर बदलणे तसेच दहिबाव-मीठबावसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधीची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी दिली.
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या ओरोस येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे, उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत, उपकार्यकारी अभियंता सौरभकुमार वर्मा, उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता प्रमोद मारबते, कनिष्ठ अभियंता ओम शिंदे, कनिष्ठ अभियंता तुषार गावकर, कनिष्ठ अभियंता सेजल सौंदडे, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर तसेच पालकमंत्र्यांचे OSD मनोज भोगटे उपस्थित होते.
बैठकीत जून महिन्यात तब्बल शंभर वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अन्नपूर्णा नदीवरील पाणीपुरवठा योजनेची वीजवाहिनी इतर गावांनाही जोडलेली असल्याने कोणत्याही गावात बिघाड झाल्यास संपूर्ण लाईन बंद करावी लागते. परिणामी दहिबाव येथील पाणीपुरवठा योजनेचाही वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
या समस्येवर उपाय म्हणून ज्या ठिकाणी विविध गावांचे फिडर आहेत, त्या ठिकाणी एबी स्विच बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे एखाद्या गावात बिघाड झाल्यास केवळ त्या गावाचा वीजपुरवठा बंद करून उर्वरित लाईन सुरू ठेवणे शक्य होणार असून पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा अखंडित राहण्यास मदत होणार आहे.
तसेच दहिबाव व मीठबाव परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. या उपकेंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे ठरले.
पाणीपुरवठा योजनेची वीजवाहिनी जंगलातून जात असल्याने वाढलेल्या झाडीमुळे आणि खराब इन्सुलेटरमुळे वारंवार बिघाड होत असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे वीजवाहिनीवरील झाडी हटविणे आणि खराब इन्सुलेटर बदलण्याचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू करून पुढील १५ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आठ दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाणार असून बैठकीचा सविस्तर अहवाल पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

