देवरूख: एस.टी. बस पासच्या नियमांवरून उद्भवलेल्या वादातून देवरूख स्थानक प्रमुखाच्या कक्षात घुसून वाहतूक निरीक्षकाला मारहाण करणाऱ्या संशयित आरोपी मिलिंद मुकुंद यादव (रा. निवे बुद्रुक, ता.
संगमेश्वर) याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थी बस पासच्या नियमावरून झालेल्या वादातून २६ ऑगस्ट रोजी दुपारी १:१८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मिलिंद यादव याने देवरूख एस.टी. स्थानक प्रमुख कक्षात प्रवेश केला. तेथे ड्युटीवर असणारे वाहतूक निरीक्षक तुषार श्रीराम कोळी (वय ३४) यांच्या खाकी गणवेशाची कॉलर धरून त्यांना कक्षाबाहेर ढकलले व भिंतीवर आपटून मारहाण केली. तसेच 'एस.टी. वाल्यांची लायकी नाही' असे बोलून अश्लील शिवीगाळ केली शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी देवरूख डेपोचे वाहतूक निरीक्षक तुषार कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी संशयित आरोपी मिलिंद यादव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

