Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देवरूख महाविद्यालयात स्वा. विनायक दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी

देवरूख महाविद्यालयात स्वा. विनायक दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आणि स्वा. वि. दा. सावरकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समरसता अभ्यासिकेच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उल्हासपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे साहस व देशभक्तीचे प्रतिक होते याबाबतची विविध उदाहरणे दिली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रकार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. आजच्या तरुण पिढीने सावरकरांचे जीवन केवळ इतिहास म्हणून न पाहता, त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. स्वा. सावरकरांनी आपल्याला राष्ट्रप्रेम, धैर्य, आत्मविश्वास आणि शिस्त यांचे महत्त्व शिकवले. आज देशाला अशाच प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि देशभक्त नागरिकांची गरज असल्याचे याप्रसंगी नमूद केले.

प्रा धनंजय दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वा. सावरकरांची अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धी व सैनिकीकरणाच्या पुरस्काराबाबतची उदाहरणे दिली. स्वा. सावरकरांच्या '१८५७चे स्वातंत्र्यसमर' या संशोधन ग्रंथामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापनेची प्रेरणा घेतल्याची महत्त्वपूर्ण बाब याप्रसंगी नमूद केली. स्वा. सावरकर निर्मित आगळ्यावेगळ्या काव्याची उदाहरणे याप्रसंगी दिली. विज्ञाननिष्ठ सावरकर व त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत माहिती दिली. समर्थ रामदास स्वामी व स्वा. सावरकर यांच्यातील परस्पर पुरकता विशद केली.

ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी ग्रंथालय विभागातील स्वा. वि. दा. सावरकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समरसता अभ्यासिकेच्या उपक्रमांची माहिती देऊन, त्या ठिकाणी स्वा. सावरकर व डॉ. आंबेडकर या दोन महनीय व्यक्तींनी स्वतः लिहिलेली व त्यांच्या व्यक्तिमत्व व कार्यावर इतर लेखकांनी लिहिलेली ग्रंथसंपदा व इतर साहित्य याबाबत माहिती दिली. आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, पण त्या स्वातंत्र्यामागे अनेक क्रांतिकारकांचे बलिदान असल्याचे प्रा. मायंगडे यांनी नमूद केले. स्वा. सावरकरांनी आपल्या सुखाचा, कुटुंबाचा आणि आयुष्याचा त्याग करून देशासाठी संघर्ष केला, म्हणूनच त्यांचे स्मरण म्हणजे केवळ जयंती साजरी करणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी नमूद केले. प्रा. सुभाष मायंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला प्रा. प्रशांत जाधव, देवरुख पोलीस स्टेशनच्या म. पो. कॉ. दर्शना पवार, सहायक अमोल वेलवणकर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital