Dailyhunt
दोडामार्ग तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; काजू-आंबा बागायतदार हवालदिल, रस्ते कामामुळे खोळंबा

दोडामार्ग तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; काजू-आंबा बागायतदार हवालदिल, रस्ते कामामुळे खोळंबा

दोडामार्ग सुहास देसाई

तालुक्यात आज अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, रस्ते विकास कामांच्या नियोजनाअभावी वाहनधारकांना चिखलाचा सामना करावा लागत आहे.

दुचाकी स्वरांना चांगलाच फटका बसला आहे

विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

​पाचच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही काळ गारवा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस चिंतेचा ठरला आहे.
​बागायतदार आणि शेतकरी संकटात
​सध्या काजू आणि आंबा हंगामाचा महत्त्वाचा काळ आहे. अशातच झालेल्या मुसळधार पावसामुळे तयार काजू बी आणि आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे काजू सडण्याची भीती निर्माण झाली असून, आंब्यावरही कीड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने तालुक्यातील बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

तिलारी ते दोडामार्ग
​रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; दुचाकीस्वार त्रस्त

​तिलारी-दोडामार्ग मुख्य रस्त्यावर सध्या खोदाईचे काम सुरू आहे. पावसामुळे या खोदलेल्या मातीचा सर्वत्र चिखल झाला असून रस्त्यावर 'चिखलाचे साम्राज्य' पसरले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
​या चिखलामुळे दुचाकीस्वारांचे प्रचंड हाल झाले. अनेक दुचाकी गाड्या चिखलात घसरल्याने किरकोळ अपघातही घडले. रस्त्यावरील या परिस्थितीमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला असून, रस्ते काम करणाऱ्या संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील सर्व भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पाणीच पाणी साचले होते

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital