दोडामार्ग:सुहास देसाई
तालुक्यातील वाढत्या वीज समस्यांबाबत अखेर पंचायत समिती सभागृहात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी तालुक्यातील वीज समस्यांचा पाढाच वाचला.
बैठकीत मांडण्यात आलेल्या २५ विविध मागण्यांपैकी अनेक मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्याने तालुकावासीयांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करणे.जंगलातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांचा (Lines) प्रश्न मार्गी लावणे.महावितरणमधील रिक्त पदे आणि उपअभियंत्याचे(Sub-Engineer) रिक्त पद भरणे.कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून देणे.
स्मार्ट मीटरबाबत असणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे.
जीर्ण झालेले वीज पोल तातडीने बदलणे.महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी दुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांसमोर ठोसपणे मांडल्या.या बैठकीला पंचायत समिती सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर यांच्यासह भाजप व शिवसेना पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत अनेक गंभीर विषयांवर सखोल चर्चा झाली असून, महावितरणच्या वतीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे दोडामार्गवासीयांना सतावणारी वीज समस्या लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे

