Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी 'पाणी अडवा'ची पहिली हाक!

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी 'पाणी अडवा'ची पहिली हाक!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आव्हानानंतर जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांचा पुढाकार

अणावमध्ये जिल्ह्यातील पहिला वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट गडद होत असताना भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनासोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी प्रत्यक्ष कृतीचा पहिला पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून मंगळवारी अणाव येथे जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा उभारण्यात येणार आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदी-नाले, ओढे आणि विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर 'पाण्याचा प्रत्येक थेंब अडवूया, भविष्यासाठी पाणी सुरक्षित ठेवूया' या संकल्पनेतून वनराई बंधारा उभारणीला सुरुवात होत आहे.

जिल्हा परिषद, संविता आश्रम पणदूर आणि रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अणाव येथील परबवाडी शाळेजवळ या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या माध्यमातून जलसंधारणाच्या कामात नागरिक, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि विविध संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्थानिक परिस्थितीनुसार पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यास आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे वनराई बंधारा हा केवळ एक उपक्रम न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे दादा साईल यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या संकटाकडे केवळ मदतीच्या प्रतीक्षेत न पाहता 'आज पाणी अडवा, उद्याचे संकट टाळा' या भूमिकेतून काम करण्याची गरज आहे. अणाव येथून सुरू होणारा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संपूर्ण जिल्हाभर ही चळवळ उभी राहावी यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital