जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्याआमदार किरण सामंत यांच्या प्रशासनाला सक्त सुचना
राजापूर प्रतिनिधी : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. या उत्सवासाठी मतदार संघात मोठया प्रमाणावर मुंबईकर दाखल होतात, तर विविध बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी होते.
या उत्सव कालावधीत महावितरण, एस. टी. आरोग्य या विभागांसह सर्वच प्रशासकिय विभागांनी सतर्क रहावे, जनतेची, भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबदारी घ्यावी अशा सुचना आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला दिल्या.
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमिवर आ. किरण सामंत यांनी मतदार संघातील सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक लांजा येथे शासकिय विश्रामगृहावर आयोजित केली होती.
याप्रसंगी प्रांताधिकारी विश्वजित गाताडे यांसह सर्व प्रशासकिय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आ. सामंत यांनी गणेशोत्सव काळात विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. गणेशोत्सव काळात महावितरणकडून विजपुरवठा अखंडीतपणे सुरू राहिल याची खबरदारी घेण्याच्या सुचना आ. सामंत यांनी केल्या. गणेशोत्सव काळात विजपुरवठा खंडीत होणार नाही काही, अडचणी असतील तर त्या आत्ताच दुर करा अशा सुचनाही आ. सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर एस. टी. प्रशासनाने मुंबईकरांच्या येण्याजाण्यासाठी सुयोग्य असे नियोजन करावे, ग्रामीण भागातील प्रवाशांचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठीही एसटी बस सेवा सुरू करावी असे निर्देश आ. सामंत यांनी दिले. बांधकाम विभागांनी रस्त्यांवरिल खड्डे भरावेत, झाडी मारावी व रस्ते सुस्थितीत ठेवावेत असेही आ. कदम यांनी सांगितले. तर आरोग्य विभागानेही सतर्क रहावे, पोलीस प्रशासनानेही या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखताना रस्ते सुरक्षिततेबाबतही उपाययोजना कराव्यात, वाहतुक कोंडीचे नियोजन करावे अशा सुचना आ. कदम यांनी दिल्या.
महसुल प्रशासनाने गणेशोत्सव काळात सुयोग्य असे नियोजन करावे, सर्व प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने काम करावे अशा सुचना आ. सामंत यांनी सर्व विभागांना दिल्या. गणेशोत्सव काळात कोणतही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा ईशारा आ. सामंत यांनी दिला.

