घावनळे येथे दिनेश वारंग यांचा वाढदिवस उत्साहात; विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा गौरव
स्वप्निल कदम :-कुडाळ
'दिनेश वारंग हे कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहणारे व्यक्तिमत्त्व आहे.
गावच्या विकासासाठी नेहमी तडफड करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. दिनेशने कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही, तर गावच्या विकासासाठी विकासकामांची यादी पूर्ण करून द्यावी हीच त्यांची नेहमी मागणी असते. हीच त्यांची कामाची पद्धत मला आवडते. समाजकारण दिनेश करतो म्हणूनच लोक त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतात. दिनेश कधीही नेत्यांना खुश करण्यासाठी पुढे-पुढे करत नाही, तर माझ्या गावची कामे झाली पाहिजेत यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. २४ तास जनतेसाठी काम करणाऱ्या दिनेशचा मला अभिमान आहे. असेच काम करत राहा, तुझा भाऊ म्हणून मी नेहमी तुझ्यासोबत असेन,' असे भावनिक गौरवोद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले.
घावनळे येथील ग्रामपंचायत सभागृहात शिवसेना उपतालुका प्रमुख, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा वाढदिवस सोहळा प्रचंड गर्दीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, देवेंद्र नाईक, दत्ता कोरगावकर, सुरज कदम, सरपंच आरती वारंग, उपसरपंच योगेश घाडीगावकर, राजाराम पालव, अनुप्रती कोचरे, साक्षी लाड, हेमंत पालव, जयराम सुद्रिक यांच्यासह ग्रामस्थ, दिनेश वारंग मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, 'दिनेश वारंग यांचे वय कमी असले तरी त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुण आहेत. सर्वसामान्य माणसांच्या समस्या समजून घेण्याची जाण त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच गावातील लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भविष्यात या नेतृत्वाला मोठी संधी मिळू शकते. ग्रामस्थांनी यापुढेही त्यांना साथ द्यावी.'
तसेच विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने मतदान मिळाल्यानंतर दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, असा विश्वास व्यक्त करत दत्ता सामंत यांनी सांगितले की, 'घावनळे गावातील बारावाड्यांपैकी आठ वाड्यांतील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. पुढील वर्षभरात सर्व वाड्यांतील रस्त्यांची गैरसोय दूर केली जाईल. गावच्या विकासात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.'
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिनेश वारंग यांनी प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. 'आमदार निलेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन गावच्या विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला. गावच्या विकासासाठी तयार केलेली कामांची यादी पुढे ठेवूनच पक्षात प्रवेश केला होता. आज तो विश्वास सार्थकी लागला असून दिलेल्या शब्दानुसार अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. उर्वरित कामेदेखील लवकर पूर्ण होतील, असा विश्वास आहे,' असे त्यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत घावनळे गावातील बांधकाम कामगार नोंदणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कामगारांची नोंदणी पार पडली. तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांचीही यावेळी मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार घावनळकर यांनी केले.

