खेड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या इंटर कॉलेज युथ फेस्टिव्हलच्या झोनल फेरीचे आयोजन येत्या ५ ऑगस्ट २०२६ रोजी खेड येथील घरडा महाविद्यालयात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या युथ फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश असून, रत्नागिरी उत्तर विभागातील महाविद्यालयांसाठी हा महत्त्वाचा सांस्कृतिक महोत्सव ठरणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध १२ झोनमध्ये युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी रत्नागिरी उत्तर हा नववा झोन असून, या झोनमध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आणि चिपळूण या तालुक्यांतील मुंबई विद्यापीठाशी संलग्न कला, वाणिज्य, विज्ञान तसेच व्यावसायिक महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.
मुख्य कार्यक्रम बुधवार, ५ ऑगस्ट रोजी होणार असला तरी त्याआधी सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी घरडा महाविद्यालयात सहभागी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्य, संगीत, फाईन आर्ट्ससह विविध सांस्कृतिक प्रकारांचा समावेश असून, सुमारे २० ते २५ महाविद्यालयांमधील ५०० हून अधिक विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि रजिस्ट्रार मा. संदीप मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. स्पर्धेचे नियोजन, सहभागी विद्यार्थ्यांची सुविधा, परीक्षकांची व्यवस्था तसेच अन्य आवश्यक बाबींची तयारी अंतिम टप्प्यात असून, या महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी उत्तर विभागातील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला नवे व्यासपीठ मिळवून देणारा हा युथ फेस्टिव्हल यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

