Dailyhunt

घरगुती वादातून सख्ख्या भावाचा पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला; राजापूर तालुक्यातील घटना

राजापूर । प्रतिनिधी : तालुक्यातील सौंदळ, भालेकरवाडी येथे एका कौटुंबिक वादाचे पर्यावसान हिंसक घटनेत झाले असून, सख्ख्या काकाने आपल्या पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.

ही घटना शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी तुकाराम गोपाळ चव्हाण (वय ७२) हे आपल्या पत्नी आणि मुलासोबत घरात असताना त्यांच्यात काही घरगुती कारणावरून वाद सुरू होता. याच वेळी फिर्यादींचे भाऊ, संशयित आरोपी दशरथ गोपाळ चव्हाण, तेथे आले आणि त्यांनी 'तुमची रोजची भांडणे का असतात? तुझी बायको आमच्या खानदानाबद्दल का बोलते?' असे म्हणून जुन्या गोष्टी उकरून काढण्यास सुरुवात केली.

जेव्हा फिर्यादींचा मुलगा नरेंद्र तुकाराम चव्हाण (वय ३२) याने दशरथ चव्हाण यांना विचारले की, 'तुम्ही इथे का आलात? तुमचा याच्याशी काय संबंध?', तेव्हा आरोपीचा राग अनावर झाला. संतापलेल्या दशरथ यांनी प्रथम आपल्या हातातील बॅटरी नरेंद्रच्या डोक्यात मारली आणि तिथून निघून गेले.
यानंतरही आरोपी आपल्या घराच्या अंगणातून शिवीगाळ करतच होता. नरेंद्र त्याला 'शिवीगाळ का करतोस?' असे विचारण्यासाठी आरोपीच्या अंगणात गेला असता, आरोपीने तिथेच ठेवलेली लाकडी दांड्याची लोखंडी कुऱ्हाड उचलली आणि नरेंद्रच्या डोक्यावर जोराने वार केला. या हल्ल्यात नरेंद्र गंभीररीत्या जखमी झाला आहे.

या प्रकरणी तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात ५ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५१(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital