कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कणकवली : तालुक्यातील सांगवे - केळीचीवाडी येथे पाणी मोटार चोरीप्रकरणी एका तरुणाविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीच्या मालकीची सुमारे १८ हजार रुपये किमतीची क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीची सबमर्सिबल पाणी मोटार चोरीस गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, प्रसाद चंद्रकांत सावंत (वय ३०, रा. सांगवे, केळीचीवाडी, ता. कणकवली) याने फिर्यादीच्या मालकीच्या जागेवरील पाणी मोटार चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित मोटार काळ्या रंगाची असून तिची अंदाजे किंमत १८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २९ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. आरोपीने फिर्यादीच्या घराच्या मागील बाजूस असलेले तारेचे कुंपण तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मोटारीला जोडलेले वीज कनेक्शन काढून टाकले तसेच फिर्यादीच्या मालकीची पाण्याची पाईपलाइन वेगळी केली. यानंतर स्वतःची पाईपलाइन जोडून फिर्यादीच्या मालकीची सबमर्सिबल पाणी मोटार चोरून नेली अशी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे फिर्यादीचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधिताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन पुढील तपास पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.

