शृंगारतळी जिल्हा परिषद गट मर्यादित होणार स्पर्धा
गुहागर प्रतिनिधी:
गुहागर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहाला जल्लोषाची किनार देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुंढर शाखेच्या वतीने 'दहीहंडी उत्सव 2026'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी जिल्हा परिषद गट मर्यादित होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यात गोविंदा पथकांच्या थरारासोबतच महिलांसाठी विशेष स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उत्सव मनसे शाखा, मुंढर, गुहागर येथे रंगणार आहे.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे 5 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला ₹2,500 रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर 'मानाची हंडी' फोडणाऱ्या विजेत्या पथकाला तब्बल ₹11,111 रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे मानाची हंडी कोण फोडणार, याकडे संपूर्ण श्रृंगारतळी गटाचे लक्ष लागले आहे.
त्याचप्रमाणे यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे महिलांसाठी विशेष स्पर्धा 'डोळे बंद करून काटीने हंडी फोडणे' अर्थात 'खेळ पैठणीचा'. हंडी फोडणाऱ्या पहिल्या पाच महिलांना पैठणी तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याने महिलांमध्येही या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
'महाराष्ट्रासाठी… मराठीसाठी… मनसे फक्त…' या विचाराने आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात परिसरातील नागरिकांनी, गोविंदा पथकांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा प्रमोद सिताराम गांधी, आणि सुजीत गांधी, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. दहीहंडीचा थरार, महिलांच्या स्पर्धेचा उत्साह आणि आकर्षक बक्षिसांची लयलूट यामुळे श्रृंगारतळीमध्ये यंदाची दहीहंडी चांगलीच रंगणार असल्याचे चित्र आहे !

