Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची सिंधुदुर्गहून रत्नागिरीला बदली

गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची सिंधुदुर्गहून रत्नागिरीला बदली

णकवली (मयुर ठाकूर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी विरोधातील कारवाईत आपला ठसा उमटवणारे पोलीस उपनिरीक्षक (PSI) अनिल हाडळ यांची प्रशासकीय बदली रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक धाडसी कारवाया करून जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण केला होता. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तीनशेहून अधिक घरफोडी, चोरी, चैन स्नॅचिंग, जबरी चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये जाऊन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संपूर्ण भारतभर त्यांनी माहितीदारांचे मजबूत जाळे निर्माण केले होते. याच नेटवर्कच्या बळावर अनेक गुंतागुंतीचे गुन्हे अल्पावधीत उघडकीस आणण्यात यश मिळाले. जिल्ह्यातील अनेक खून, दरोडे आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांनी परराज्यातील बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये महिनोन् महिने मुक्काम ठोकत तपासाची सूत्रे हलवली आणि अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपासातील चिकाटी, तांत्रिक कौशल्य, माहितीदारांचे जाळे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता यामुळे त्यांची ओळख गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी निर्माण झाली होती. त्यांच्या बदलीमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलातील एक अनुभवी आणि धाडसी अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याला लाभणार आहे.

मात्र अनिल हाडळ यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि गुन्हेगारीला आळा घालणारा अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने गमावला अशी चर्चा कणकवली शहरात रंगली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital