मसुरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुक्यातील हडी-सुर्वेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका घराच्या अंगणात सुमारे १० फूट लांबीचा भलामोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हडी येथील धाडसी सर्पमित्र केदार हडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या अजगराला अत्यंत शिताफीने पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सर्पमित्रांच्या या तत्परतेमुळे अनपेक्षित संकट टळले.
शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अनिकेत सुर्वे आणि ऋषी सुर्वे हे दोघे गावातील एका पायवाटेने मुख्य रस्त्याच्या दिशेने जात होते. अंधार असल्याने ते जपून चालत असतानाच, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या राजू भोजने यांच्या अंगणात त्यांना काहीतरी अवाढव्य सरपटताना दिसले. जवळ जाऊन टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता, तिथे सुमारे १० फूट लांबीचा अजगर सुस्त पडलेला दिसून आला.
अनिकेत आणि ऋषी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत हडी येथील प्रसिद्ध सर्पमित्र केदार हडकर यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच केदार हडकर यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने सुर्वेवाडी गाठली.
अजगर वजनाने मोठा आणि शक्तिशाली असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक होते. मात्र, केदार हडकर यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर, अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे जेरबंद केले. अजगर पूर्णपणे ताब्यात आल्याचे पाहिल्यानंतर जमा झालेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या धाडसी रेस्क्यू मोहिमेत स्थानिक पोलिस पाटील दिनेश सुर्वे, अनिकेत सुर्वे आणि ऋषी सुर्वे यांनी सर्पमित्र केदार हडकर यांना मोलाची साथ दिली. अजगर पकडल्यानंतर वनविभागाच्या नियमांचे पालन करत, मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घनदाट जंगलात त्याला सुरक्षितरित्या सोडून देत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
रात्रीच्या वेळी दाखवलेली ही तत्परता आणि वन्यजिवाचे प्राण वाचवल्याबद्दल सर्पमित्र केदार हडकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हडी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

