निलेश जाधव / देवरूख:
जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेते विनय येडेकर यांची देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाला सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी या दोघांनीही संस्थेच्या विविध संकुलांची पाहणी करून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी संस्थेच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांच्याहस्ते दोघांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी त्यांना संस्थेबद्दल माहिती दिली.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ ही कोकणातील एक महत्वाची शिक्षण संस्था आहे. या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. व्याख्याने आयोजित केली जातात. संस्था यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि देशभक्तीची बीजे रोवण्याची पवित्र जबाबदारी ओळखून संस्थेने आपल्या शैक्षणिक संकुलाच्या आवारात भव्य शहिद स्मारक उभारले आहे. हे स्मारक राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे एक जिवंत प्रेरणास्थान आहे. अनेकजण संस्थेच्या या शहिद स्मारकाला भेट देत याठिकाणी नतमस्तक होत असतात.
अनेक संकुले उभारणाऱ्या या देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेते विनय येडेकर यांनी सदिच्छा भेट देत स्वर्गीय काकासाहेब पंडित शैक्षणिक संकुल, शहिद स्मारक, स्पोर्ट्स काँम्प्लेअ्स, कलादालन आणि विज्ञान केंद्र संकुल यांची पाहणी करत संस्थेने केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोरच इतर खेळातही विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे. आपली सर्वांगीण प्रगती करावी. असे सांगितले. संस्थेचे माजी विद्यार्थी आणि आयकर विभागाचे उपायुक्त मिलिंद कुलकर्णी यांनी या भेटीसाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डाँ. नरेंद्र तेंडोलकर व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

