Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते: पद्मश्री परशुराम गंगावणे

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते: पद्मश्री परशुराम गंगावणे

सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे आयोजन

​सावंतवाडी : 'मी एका पायाने असक्षम असलो तरी माझ्यातील आत्मविश्वास मला संपूर्ण महाराष्ट्र फिरवतो.

शारीरिक मर्यादा कधीही यशाच्या आड येत नाहीत; जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते,' असा प्रेरणादायी संदेश पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

​कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ तथा शिक्षण सन्मान सोहळा २०२६' सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपरिषद सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

​कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळेकर यांनी केले.
प्रास्ताविक करताना समीर शिर्के यांनी संस्थेच्या एचआयव्ही जनजागृती, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, सागरी स्वच्छता, वृक्षारोपण व जलशुद्धीकरण प्रकल्पांविषयी माहिती दिली.

​सोहळ्यात तालुक्यातील दहावी व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक शाखेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी, तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सोबतच दहावीत १०० टक्के निकाल राखणाऱ्या ३० माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

​मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केवळ गुण म्हणजेच गुणवत्ता नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. पालकांनी मुलांशी संवाद साधावा, सायबर फसवणुकीपासून सावध राहावे आणि स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कौशल्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते मोठे यश मिळवू शकतात, असे मत मांडले. डी. एस. जांभेकर यांनी शिक्षक आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले, तर संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी तज्ज्ञांच्या मदतीने स्पर्धा परीक्षांबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्याचा विश्वास व्यक्त केला.

​या सोहळ्यास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक , डॉ. ॲड. अश्विनी लेले, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशन पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, रुझुल पाटणकर, डॉ. विनया बाड, वैभव पवार, प्रा. रूपेश पाटील, मानसी परब, सुशील चौगुले, डी.एस जांभेकर ,रामचंद्र गावडे, बाळकृष्ण राणे, अभिमन्यू लोंढे, आनंद डोह, बाळू देसाई यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​शेवटी प्रथमेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital