सामाजिक बांधिलकी, साधेपणा व अध्यात्मिक मूल्यांचा केला गौरव; सेवाश्रमाच्या कार्याशी कायम जोडलेले राहण्याची दिली ग्वाही
कुडाळ :
देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक तथा बाईक हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे संस्थापक अनिल पाटोदिया व त्यांच्या पत्नी अर्चना पाटोदिया यांनी जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देत संस्थेच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
निराधार, ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंसाठी निःस्वार्थ भावनेने सुरू असलेले सेवाकार्य पाहून हे दाम्पत्य भारावून गेले. समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या अशा संस्थांना सर्व स्तरांतून भक्कम पाठबळ मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
देशातील सुमारे १५ प्रमुख शहरांमध्ये आलिशान हॉटेल्सचे यशस्वी जाळे उभारणारे अनिल पाटोदिया हे उद्योगविश्वातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे. उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय यशाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि अध्यात्मिक मूल्यांची जपणूक ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही विविध उद्योग-व्यवसायांमध्ये कार्यरत असून अनेक उद्योगांनी जागतिक स्तरावर यशस्वी भरारी घेतली आहे. त्यांच्या सहचारिणी अर्चना पाटोदिया यादेखील विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
जिव्हाळा सेवाश्रमातील विविध उपक्रमांची पाहणी करून पाटोदिया दाम्पत्याने लाभार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला. सेवाश्रमातील कार्यपद्धती, येथील वातावरण आणि सेवाव्रतींचे समर्पण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सेवाश्रमाचे कार्य केवळ समाजसेवा नसून मानवतेची खरी उपासना असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी संस्थेच्या वतीने अनिल पाटोदिया यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही जिव्हाळा सेवाश्रमाच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, उद्योगविश्वात मोठे स्थान मिळवूनही अनिल पाटोदिया व अर्चना पाटोदिया यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, नम्रता आणि अध्यात्माप्रती असलेली नितांत श्रद्धा सर्वांनाच भावली. भेटीदरम्यान ते सातत्याने ईश्वराचे स्मरण करत होते. गोमातेप्रती असलेले त्यांचे प्रेम, दयाभाव आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची शैली उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. जिव्हाळा सेवाश्रमाच्या कार्याशी भविष्यातही कायम जोडलेले राहून पुन्हा भेट देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले. जयप्रकाश प्रभू यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. या भेटीचे नियोजन आणि समन्वय यासाठी मोहन आरावंदेकर यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे उद्योग, समाजसेवा आणि अध्यात्माचा प्रेरणादायी संगम जिव्हाळा सेवाश्रमात अनुभवायला मिळाला.

