Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कणकवलीत ९ ऑगस्टला राज्यातील पहिला 'भारुड महोत्सव'

कणकवलीत ९ ऑगस्टला राज्यातील पहिला 'भारुड महोत्सव'

सांप्रदायिक भजनी संस्थेचा अनोखा उपक्रम

णकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थाचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी दिली माहिती

कणकवली : भारुडाच्या माध्यमातून पुराण, संतपरंपरा आणि हिंदू संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेच्या वतीने रविवार, ९ ऑगस्ट रोजी नांदगाव तिठा पुलाखाली राज्यातील पहिल्या 'भारुड महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता महोत्सवाला प्रारंभ होणार असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी दिली.

कणकवली शासकीय विश्रामगृहाच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सदस्य मंगेश खाडये, मारुती मेस्त्री, लक्ष्मण बागवे, मयूर ठाकूर, सुदर्शन फोपे, शेखर चव्हाण, उदय पारकर, पंढरी जाधव, श्रीकांत शिरसाट, चंद्रकांत गुरव, महानंदा चव्हाण, प्रकाश मेस्त्री आदी उपस्थित होते.

पुढे बुवा श्री. पारकर म्हणाले, २००९ पासून कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था सेवाभावी कार्य करत असून भजन स्पर्धा, वाद्य स्पर्धा, गायन स्पर्धा, सामाजिक उपक्रम तसेच आपत्तीच्या काळात गरजू भजनी बुवांना मदत करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. कोरोनाकाळातही आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक भजनी बुवांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम संस्थेने केले. सध्या २०-२० भजनांच्या वाढत्या प्रचलनामुळे भारुड सादरीकरणाचे प्रमाण कमी होत असून पुराणातील कथा, संतवाङ्मय आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असलेले भारुड जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथ कळला तर संत कळतो आणि संत कळला तर भगवंत कळतो, असे सांगत त्यांनी ग्रंथसंवर्धन आणि संस्कृती जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पहिल्या भारुड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक भजनी बुवा रामायण, महाभारत, शिवलीलामृत, गणेश पुराण, गरुड पुराण यांसारख्या ग्रंथांतील स्वतंत्र कथानकावर आधारित भारुड सादर करणार आहे. यामुळे नव्या पिढीतील भजनी बुवांमध्ये भारुडाविषयी आकर्षण निर्माण होईल, तसेच वाचन आणि धर्मग्रंथांविषयीची आवड वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महोत्सवासाठी तालुक्यातील नामवंत भजनी बुवांना निमंत्रित करण्यात आले असून संतोष मिराशी, चंद्रकांत गुरव, मंगेश खाडये, हेमंत तेली, सुजित परब, उदय राणे, सतीश सावंत (भिरवंडे), प्रथमेश चव्हाण (फोंडा), ऋतुजा पाळेकर, गनंजय तेली तसेच इतर निमंत्रित भजनी बुवा भारुड सादर करणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून सर्व भारुडांचे सादरीकरण सायंकाळपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याचे पारकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असलेला हा भारुड महोत्सव संतपरंपरा, पुराणपरंपरा आणि भारुड या लोककलाप्रकाराचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वासही श्री. पारकर यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital