Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कापसापासून बनल्या हार, मोदक, फुले, बाहुली, गणपती अशा एक ना एक आकर्षक वस्तू

कापसापासून बनल्या हार, मोदक, फुले, बाहुली, गणपती अशा एक ना एक आकर्षक वस्तू

वेंगुर्ले तालुक्यातील ३४ अंगणवाड्यांनी भरवले कौशल्य विकासाचे प्रदर्शन

परुळे : प्रतिनिधी
कापूस म्हटला की त्याचा वापर नेहमी देवघरात होतो असे नाही तर त्यापासून हार, मोदक, फुले, बाहुली, घरट्यात बसलेली पक्षांची पिले, गणपती अशा एक ना एक आकर्षक वस्तू अंगणवाडी सेविका आणि पालकांनी तयार केल्या होत्या.

वेंगुर्ले तालुक्यातील ३४ अंगणवाड्यांनी परुळेबाजार ग्रामपंचायतीत भरवलेल्या प्रदर्शनात कौशल्य विकासाचे दालन उघडले होते.

वेंगुर्ले एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प परुळेबाजार बीटच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि पालक यांचा कौशल्य विकास व्हावा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू अशी संकल्पना ठेवून आठ ग्रामपंचायत क्षेत्रातील कुशेवाडा, म्हापण, चिपी, भोगवे, कोचरा, केळुस, कालवी बंदर अशा जवळपास ३४ अंगणवाड्यांमधील सेविका आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कापसापासून आकर्षक वस्तू तयार केल्या. त्या तयार करताना वेगवेगळ्या फुलांचा आकार देण्यात आला. त्यात रंगांचाही वापर करत बाजारात मिळणाऱ्या मन्यांसह इतर सुशोभीकरणाच्या साहित्याचा वापर करून आकर्षक मोदक, फुलांचे हार तयार करण्यात आले. लवकरच येणाऱ्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बापांसाठी त्याचा उपयोग होणार आहेच शिवाय कापसापासून गणपती, घरट्यातील चिऊताईची पिल्ले असे तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तूंची शोभिवंत असून त्यांची विक्रीही करता येणार आहे.

बचतगटाच्या सहाय्याने विक्री

महिला बचत समूहांच्या सहाय्याने कापसापासून तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग झाले तर पालकांनाही एक रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. अशा वस्तू तयार करताना कौशल्य विकासाला वेगळीच चालना मिळेल. प्रत्येकवेळी कलेतून नाविन्यपूर्ण वस्तू घडतील असा विश्वास यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला.

कलेला वेगळीच ऊर्जा

मागील प्रदर्शनात प्रत्येक अंगणवाडीने पालकांच्या सहकार्याने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करताना झाडांची मुळे, करवंट्या, जुनाट लाकूड यांचा वापर करत होडी, जहाज, स्वयंपाक घरातील भांडी शेतीचे साहित्य, यासह विविध साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडले होते. परुळेबाजार बीट मधील अंगणवाडीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नेहमीच असे उपक्रम घेतले जात असल्यामुळे कलेला एक वेगळीच ऊर्जा मिळत आहे.

कोट

बाल वयातच मुलाच्या लक्षात आले पाहिजे की मी ग्रामीण भागात राहत असताना पारंपरिक वस्तूंचा कशाप्रकारे वापर केला. त्या वस्तूचे महत्त्व पुढच्या पिढीलाही सांगता येणार आहे. स्वतःला पुढे जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा मानस त्याच्यात तयार होतो. प्रदर्शनात मांडलेली वस्तू मी तयार केली आहे. याचा गर्व त्या लहान बालकात असतो पुढे जाऊन नवीन काहीतरी करता येईल ही जिज्ञासा त्याच्यात तयार होते त्यातूनच सृजनशीलतेचा विकास होतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital